शिरपूर तालुक्यातील जळोद येथील आश्रमशाळेच्या आवारातून चोरीस गेलेल्या पिकअप (छोटा हत्ती) वाहनाचा शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे वाहन हस्तगत करण्यात आले असून वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी दुपारी २ ते ३.२६ वाजेच्या दरम्यान जळोद (ता. शिरपूर) येथील आश्रमशाळेच्या आवारातून शाळेच्या धान्य वाहतुकीसाठी वापरले जाणारे एमएच-१५/सीके-४८८२ क्रमांकाचे पिकअप वाहन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३४/२०२६ अन्वये वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, जुने भामपूर येथील दोन युवकांनी सदर वाहन चोरी केली आहे. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीची पडताळणी करत संशयितांचा शोध घेतला.
तपासादरम्यान पोलिसांनी संगम गंगाराम सोनवणे (भिल, वय २२) व अनिल खेबराज भिल (भवरे, वय २२, दोघे रा. जुने भामपूर, ता. शिरपूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यावरून गावाजवळील एका शेडजवळ लपवून ठेवलेले चोरीचे पिकअप वाहन पोलिसांनी जप्त केले.
या कारवाईत १ लाख ४० हजार रुपये किमतीचे पिकअप वाहन हस्तगत करण्यात आले असून वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, यांच्यासह पोलीस कर्मचारी रवींद्र आखडमल,अतुल पाटील, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, सचिन वाघ, विनोद अखडमल, गोविंद कोळी, मनोज महाजन,भटू साळुंखे आणि प्रशांत पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना जेरबंद करण्यात शिरपूर शहर पोलिसांना यश आल्याने पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
