शिरपूर : मुंबई–आग्रा महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळील रोज पॅलेस हॉटेल समोर दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने 29 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 20) दुपारी घडली.
या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णा उखा राठोड वय 29, रा.शितापूर, ता.जि.बुरहानपूर, म.प्र., सध्या रा. दहिवद, ता. शिरपूर असे मृताचे नाव आहे. तो मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तो त्याच्या ताब्यातील एमपी 46 एमएस 5417 या क्रमांकाच्या एचएफ डिलक्स दुचाकीने महामार्गावरून दहिवदहून शिरपूरकडे जात असताना शिरपूर फाट्याजवळील हॉटेलसमोर मागून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.
या अपघातात कृष्णा राठोड याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला हायवे अॅम्ब्युलन्सद्वारे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास त्याला मयत घोषित केले.
दरम्यान, अपघात घडवून अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत लखन सुकलाल राठोड (रा. मोहाडी, ता. जि. जळगाव) यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.