शिरपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका पदभरतीसाठी आवश्यक असलेला ग्रामपंचायतीचा ठराव देण्यास नकार दिल्याचा आरोप करत तालुक्यातील महादेव दोंदवाडा येथील सरपंच व ग्रामसेवकाविरोधात ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर शिस्तभंगासह कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महादेव दोंदवाडा ग्रामपंचायतीमध्ये आशा स्वयंसेविकेच्या एका पदासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी अर्ज करताना इतर आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायतीचा ठराव जोडणे बंधनकारक आहे. मात्र गावातील इच्छुक महिलांना हा ठराव देण्यास सरपंच संगीता पावरा व ग्रामसेवक विजय पाटील जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
यासंदर्भात संबंधित महिलांनी ठरावाची मागणी केली असता, “तुम्ही कोणाकडेही तक्रार करा, मी ठराव देणार नाही,” असे सांगण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. यापूर्वीही ५ मार्च रोजी याच प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्वतःच्या मर्जीतील महिलेला आशा स्वयंसेविकेचे पद मिळवून देण्यासाठी इतर पात्र महिलांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर होत असून, संबंधितांना समज देऊन तातडीने आवश्यक दाखले देण्याचे आदेश द्यावेत तसेच जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर काजल पावरा, नीतेश पावरा, देवीलाल पावरा, दीपक पावरा, सागर पावरा, सुरत पावरा, लक्ष्मण पावरा आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
