
शिरपूर,— महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत बबळाज (ता. शिरपूर) येथे शुक्रवारी समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे 650 लाभार्थ्यांनी उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या 18 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित अडचणी जागेवर सोडविण्यासाठी मंडळस्तरावर समाधान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली बबळाज येथे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक आणि तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तहसील कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी-कर्मचारी, होळनांथे मंडळातील सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात देण्यात आलेले लाभ
सेतू शाखा — उत्पन्न दाखले, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र
संजय गांधी शाखा — मंजूर प्रकरणांची वाटपपत्रे
पुरवठा विभाग — नवीन व दुबार शिधापत्रिका वाटप
बाल विकास विभाग — बेबी किटचे वितरण
कृषी विभाग — ट्रॅक्टर अनुदान मंजुरीपत्रे
शिबिरात आलेल्या नागरिकांनी विविध विभागांच्या स्टॉलला भेट देऊन योजनांची माहिती जाणून घेतली आणि आवश्यक कागदपत्रे व लाभ तात्काळ प्राप्त केले.
प्रास्ताविकात तहसीलदार महेंद्र माळी यांनी अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी विद्यार्थ्यांनी, शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी अशा शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी होळनांथे मंडळातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शासनाच्या योजना थेट गावपातळीवर उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
