शिरपूर : शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित शहरातील मुकेश आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत 100 टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह यश मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
विद्यालयात प्रथम क्रमांक तन्मय नरेश देवरे 95.80 टक्के, द्वितीय क्रमांक साक्षी निलेशभाई परमार 95 टक्के, तृतीय क्रमांक मोहित अमृत पवार 94.60 टक्के, चतुर्थ क्रमांक तन्मय राजेंद्र राजपूत 94.40 टक्के, पाचवा क्रमांक नव्या मिलिंद भामरे 94 टक्के गुण मिळविले. 32 पैकी तब्बल 26 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले असून उर्वरित 6 विद्यार्थ्यांनी 85 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेला अधिक बळकटी दिली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचा आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथील राजगोपाल भंडारी हॉल मध्ये समारंभपूर्वक गुणगौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव सौ. रेषा पटेल, खजिनदार बबनलाल अग्रवाल, संचालक अतुल भंडारी, संचालक विजय भंडारी, कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा, अकॅडमिक इन्चार्ज पी. व्ही. पाटील, मुख्याध्यापिका स्मिता पंचभाई, उपमुख्याध्यापिका सौ. ममता न्याती यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, पालक आणि व्यवस्थापन समितीकडून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
