शिरपूर /- शहरातील खंडेराव मंदिरालगत असलेल्या भाजीपाला मार्केटमध्ये अंदाजे 40 ते 45 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, 11 मे रोजी रात्री सुमारे 9.15 वाजेच्या सुमारास भाजीपाला मार्केट परिसरात एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सदर व्यक्तीस खाजगी वाहनाच्या मदतीने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रात्री सुमारे 9.30 वाजता त्यांना मृत घोषित केले.
मृत व्यक्तीचे नाव, गाव व इतर ओळख पटलेली नसून त्याचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. तीव्र उष्म्यामुळे मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉय यांच्या खबरीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ओळख पटू न शकल्याने पोलिसांनी मृतदेहाची नियमानुसार विल्हेवाट लावली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे करीत आहेत.
