शिरपूर (प्रतिनिधी): बभळाज उपकेंद्रातून शेतीपंपांसाठी दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यात करण्यात आलेली एक तासाची कपात त्वरित रद्द करून पूर्ववत आठ तास सुरळीत व उच्च दाबाने वीजपुरवठा करावा, अन्यथा महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने १८ मे रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बभळाज उपकेंद्रात महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, या परिसरातील शेतकऱ्यांना यापूर्वी शेतीपंपांसाठी आठ तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून वीजपुरवठा सात तासांवर आणण्यात आला असून तोही कमी दाबाने व वारंवार खंडित होत आहे.
सध्या वाढत्या तापमानामुळे केळी, पपई तसेच नव्याने लागवड केलेल्या पिकांना अधिक पाण्याची आवश्यकता आहे. मात्र अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रोपे जळण्याचा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे किसान सभेने नमूद केले आहे.
शेतकऱ्यांना पुन्हा आठ तास नियमित व योग्य दाबाने वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सोमवार, १८ मे रोजी बभळाज उपकेंद्र कार्यालयासमोर किसान सभेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या आंदोलनात परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.
