शिरपूर/धुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहीर अनुदानाचा अंतिम हप्ता काढून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली.
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव विश्वरजित संजय भामरे (वय ३२) असे असून तो पंचायत समिती, धुळे येथे तांत्रिक सहाय्यक म्हणून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वहिनीच्या नावे असलेल्या शेतजमिनीवर ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये विहीर खोदकामासाठी ३ लाख ११ हजार ४८० रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी ३ लाख १० हजार रुपये तक्रारदाराच्या खात्यावर जमा झाले होते. उर्वरित अंतिम हप्ता मंजूर करून देण्यासाठी भामरे यांनी ७ हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी पंचायत समिती, धुळे येथे सापळा रचण्यात आला. यावेळी भामरे यांनी तक्रारदाराकडून ७ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक भारत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बारसे, पद्मावती कलाल, ,पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, पोकॉ. मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, सागर माळी, मपोकॉ. रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, पोकॉ. जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.
