शिरपूर, ता. १० मे : शिरपूर तालुक्यातील शहादा रस्त्यावर भामपूर शिवारात रविवारी दुपारी कार आणि मालवाहू पिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला पुढील उपचारांसाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर हिलाल मराठे (वय ४२) व पत्नी योगिता किशोर मराठे (वय ३५, रा. विखरण, ता. शिरपूर) हे नातेवाईकांच्या लग्नातील हळदी समारंभासाठी रविवारी दुपारी सुमारे तीन वाजता एमएच-१८ बीसी-६५७५ क्रमांकाच्या कारने विखरणहून शहाद्याकडे निघाले होते.
विखरण गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर भामपूर शिवारात समोरून येणाऱ्या मालवाहू पिकअपशी त्यांच्या कारची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की पिकअप वाहन रस्त्यावर उलटले, तर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली.
या अपघातात किशोर मराठे व योगिता मराठे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी दोघांनाही तत्काळ खासगी वाहनाने शिरपूर येथील सिद्धीविनायक रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. अमित गुजराती यांनी प्राथमिक उपचार करून किशोर मराठे यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला, तर योगिता मराठे यांना गंभीर अवस्थेमुळे धुळे येथे रेफर करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयात तपासणीदरम्यान डॉक्टरांनी किशोर मराठे यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
