क्राईम ब्लास्ट ब्यूरो
पाच वर्षात रक्कम दामदुप्पट करून मिळेल असे आमिष दाखवून सहारा क्रेडिट सोसायटी नामक संस्थेच्या तीन कर्मचाऱ्यांनी दोन महिलांची साडेतीन लाख रुपयात फसवणूक केली. ही फसवणूक 2016 ते 2020 या कालावधीत करण्यात आली असून त्यानंतर ऑफिसला कुलूप लावून संशयित फरार झाले आहेत.
निमझरी नाका येथील अंगणवाडी ऑफिसजवळ टॉवर बिल्डिंगमध्ये सहारा सोसायटीने ऑफिस उघडले होते. दरमहा ठराविक रक्कम जमा करा व पाच वर्षांनी दामदुप्पट पैसे मिळवा असे आमिष दाखवून या सोसायटीच्या कथित कर्मचाऱ्यांनी पिंपरी येथील गीताबाई काळू वडार व बेबीबाई शालिक वडार या महिलांकडून दरमहा 300 रुपये याप्रमाणे अनुक्रमे एक लाख 80 हजार व एक लाख 53 हजार 20 रुपये जमा केले. मात्र पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरही दामदुप्पट किंवा मुद्दल रक्कम दिली नाही. तुमच्याकडून जे होईल ते करा अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर ऑफिसला कुलूप लावून संशयित फरार झाले. दोन्ही महिलांनी थाळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित कलेक्शन एजंट कमलेश अण्णा माळी, मॅनेजर योगेश सोनवणे आणि जितेंद्र अशोक जाधव यांच्याविरोधात खोटे पासबुक, खोट्या पावत्या देऊन तीन लाख 33 हजार 20 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अनेक जणांची संशयितांनी फसवणूक केल्याचा संशय आहे.