ट्रक – बसच्या अपघातात बालिका ठार, ३० जखमी

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने एसटी बसला धडक देऊन झालेल्या अपघातात आठवर्षीय बालिका ठार तर सुमारे 30 प्रवासी जखमी झाले. त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना प्रथमोपचार करून धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

२९ जुलैला सकाळी साडेआठला शिरपूर टोल नाक्यापुढे दभाशी गावाजवळ हा अपघात घडला. गिधाडे येथील ब्रिटिशकालीन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे बसेसची वाहतूक दभाशीमार्गे सुरू आहे. शिरपूर आगाराची शिरपूर – शिंदखेडा बस (MH 14 BT 2112) दभाषीकडे वळत असताना शिरपूरकडे येणाऱ्या ट्रक (RJ 11GC 3487) ने तिला जोराची धडक दिली.

 

 

या अपघातात नुपूर गणेश सोनवणे – माळी ही आठ वर्षीय बालिका ठार झाली. ती शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील रहिवासी आहे. शहादा तालुक्यात कोंढवळ येथे कानबाईच्या कार्यक्रमासाठी ती गेली होती. तेथून शिरपूरला आल्यानंतर ती पाटण येथे परत जाण्यासाठी निघाली होती. या अपघातात तिच्या आजी निर्मलाबाई माळी व अरुणाबाई माळी आणि आजोबा सुरेश माळी हेदेखील गंभीर असून त्यांना धुळे येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताचे वृत्त कळताच हायवे रुग्णवाहिका सेवा आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिका तातडीने अपघातस्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मृत बालिका नुपूर हिच्या शोक संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. बस चालकाच्या हलगर्जीपणाने हा अपघात झाल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदखेडा बाजार समितीचे माजी सभापती नारायण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डी.आर.पाटील, शामकांत इशी यांनी रुग्णालयात जखमींच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!