पाच हजाराची लाच घेताना व्यवस्थापक सापडला !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

व्याजाचा परतावा मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे समन्वयक शुभम भिका देव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मर्या. मुंबई यांच्याकडुन “वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत” रोजगाराकामी जेसीबीसाठी कर्ज मिळणेकरीता पात्रता प्रमाणपत्र घेवुन इंडसइंड बँकेकडुन २४,९६,०००/- रुपये वैयक्तिक कर्ज घेवुन जेसीबी खरेदी केले होते.

सदर घेतलेल्या वैयक्तिक कर्जाच्या अठरा हप्त्यांची मुदतीत परतफेड करुन आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याजपरतावा योजनेअंतर्गत त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेल्या व्याजाची रक्कम परत मिळणेकरीता त्यांनी दि.१४.०७.२०२५ रोजी महामंडळाच्या धुळे येथील कार्यालयात जावुन जिल्हा समन्वयक शुभम भिका देव यांची भेट घेतली असता त्यांनी कर्जाचा व्याज परतावा मिळणेकरीताची आवश्यक कागदपत्रे तक्रारदार यांचेकडुन जमा करुन घेवुन तकारदार यांचा व्याज परताव्याचा प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम दिल्याशिवाय त्यांचा प्रस्ताव पाठविणार नाही असे तक्रारदार यांना सांगितल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात आज रोजी समक्ष येवुन तकार दिली होती.

सदर तक्रारीची आज दि.१६.०७.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता जिल्हा समन्वयक शुभम भिका देव यांनी तक्रारदार यांच्याकडे ५,०००/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम त्यांनी धुळे शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात येवुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे व अपर पोलीस अधीक्षक श्री माधव रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!