क्राइम ब्लास्ट ब्यूरो
कुख्यात एपीके प्रकारची फाईल डाऊनलोड केल्यामुळे मोबाईल हॅक झाला. त्यावरुन अश्लील फोटो सर्वत्र व्हायरल झाले. आपल्या व्हॉटसअप अकाऊंटवरुन हे सर्व कृत्य घडल्यामु़ळे बदनामी होईल अशा भीतीने 20 वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील ताजपुरी गावात पाच जुलैला घडली. थाळनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन सायबर शाखेकडे तपास द्यावा अशी मागणी युवकांकडून केली जात आहे.
किशन जितेंद्र सनेर असे मृत युवकाचे नाव असून तो शिरपूर शहरात एका डी.फार्मसी कॉलेजमध्ये दुसर्या वर्षाचा विद्यार्थी होता. पाच जुलैला दुपारी त्याच्याकडून एपीके फाईल चुकीने डाऊनलोड झाली. त्यामुळे मोबाईलचा संपूर्ण कंट्रोल त्रयस्थ व्यक्तीकडे गेला. त्याने गैरवापर करुन मोबाईलमध्ये असलेले सर्व व्हाटस अप अकाऊंट आणि ग्रुप्सवर अश्लील फोटो पाठवले. त्यामुळे घाबरलेल्या किशन सनेर याने स्वत:चे अकाऊंट डिलिट केले. मित्रांनी समजूत घातल्यावर तो घरी गेला. आईवडील शेतात असल्याची संधी साधून त्याने घराच्या वरील मजल्यावर आईच्या साडीने गळफास लावून आत्महत्या केली.
थाळनेर पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घरातील एकुलत्या एक मुलाच्या अशा दुर्देवी मृत्यूमुळे ताजपुरी गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत संशयित सायबर भामट्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृत किशनच्या मित्रांकडून केली जात आहे.