शिंदखेडा (प्रतिनिधी) : शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेळाणे आणि नरडाणा परिसरात घरफोडी व मोबाईल चोरीच्या घटना घडविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नरडाणा पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तीन आरोपी आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच घरफोडी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जूनच्या मध्यरात्री ते ७ जूनच्या पहाटे दरम्यान डाबली (ता. शिंदखेडा) येथील अरुण मुरलीधर पाटील (वय ४३) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, बँकेचे पासबुक आणि मोबाईल फोन चोरून नेले होते. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331(4), 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना नरडाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. निलेश मोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी संशयित गोरख सुरेश पवार (वय १९), गोकुळ छगन भिल (वय २०), बादल राजू सोनवणे (वय १८) तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी डाबली, मेळाणे आणि नरडाणा परिसरातील घरफोडी व मोबाईल चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, सहा मोबाईल फोन तसेच एक बजाज पल्सर मोटारसायकल (MH-12/LR-0945) असा एकूण २.७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे नरडाणा पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हा क्रमांक 96/2026 व 109/2026 हे घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोउनि. रवींद्र महाले, विजय पाटील, रवींद्र शिंदे तसेच पोलिस कर्मचारी ललित पाटील, राकेश शिरसाठ, गणेश पाटील, नारायण गवळी, भरत चव्हाण, योगेश गिते, अनारसिंग पवार, धनेश कुंकारी, रविंद्र मोरणीस, विक्रांत देसले, चंद्रकांत सांडुंबे, विजय माळी, विनोद कोळी, प्रशांत पाटील, सचिन बागुल, अनिल सोनवणे, भरत भगरे, सुनील पगारे, सुरजकुमार सावळे व होमगार्ड जितेंद्र रणदिवे यांचा समावेश होता.
