शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करत तीन गावठी बनावटीच्या पिस्टलांसह दोन संशयितांना अटक केली. या कारवाईत सहा जिवंत काडतुसे, दोन अतिरिक्त मॅगझीनसह एकूण १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. २३ मे रोजी सायंकाळी गुन्हेशोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन इसम मध्यप्रदेशातील उमर्टी येथून आंबे मार्गे शिरपूरकडे गावठी कट्टे घेऊन येत आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खंबाळे-आंबे मार्गावर सापळा रचला.
आंबे गावाबाहेरील दगडी बाकड्याजवळ दोन संशयित इसम दिसून आले. पोलिसांची गाडी पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी आपली नावे विकास उर्फ पल्लुराम मनोज घारु (रा. येवला, जि. नाशिक) व रावसाहेब अशोक मोरे (रा. निमगाव, ता. येवला) अशी सांगितली. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत तीन गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे व दोन अतिरिक्त मॅगझीन जप्त करण्यात आले.
याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई मनोज कचरे करीत आहेत. सदरची कारवाई सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी (अतिचार्ज शिरपूर तालुका पोस्टेचे), पीएसआय मनोज कचरे, पोहेकॉ संतोष पाटील,संदिप ठाकरे,राजु ढिसले,पोकॉ योगेश मोरे, विजय ढिवरे, स्वप्निल बांगर, चाअसई अल्ताफ मिर्झा,चापोकॉ इसरार फारुकी अशांनी केली आहे.
